अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार, २ डिसेंबरपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार आहे. या पृष्ठभूमीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना बुधवार, २ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ९ डिसेंबरपर्यंत अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यानुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांतील पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी, मतदान केंद्र, आचारसंहितेचे पालन व उमेदवारी अर्ज स्वीकरण्याची प्रक्रिया यासंदर्भात बैठकीत राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना माहिती देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) उदय राजपूत यांनी निवडणुकीसंबंधी माहिती राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना दिली. या बैठकीला भाजपचे नाना कुळकर्णी, बसपाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वाघमारे, एन.व्ही. घरडे, मनसेचे विजय बोचरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा सरचिटणीस चेतन पुंडकर, अँड. गणेश पिसे, बुलडाणा येथील भाजपचे प्रल्हाद पाटील व अनिल बगाडे उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून
By admin | Published: December 02, 2015 2:52 AM