अकोला : शेतकऱ्यांकडील कापूस, तूर, हरभरा, मका व ज्वारी या शेतमालाची खरेदी प्रक्रिया येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज यंत्रणेला दिले. यावेळी ते म्हणाले, की खरेदी केंद्रावर येणारा माल हा शेतकऱ्यांचाच आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, शेतकºयाच्या नावाखाली व्यापारी माल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश ना. भुसे यांनी दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा आज अकोला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात आला. या बैठकीस विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया उपस्थित होते.अमरावती विभागात लागवडयोग्य क्षेत्र ३५.१४ लाख हेक्टर इतके असून, खरीप हंगामाचे क्षेत्र हे ३२.३२ लाख हेक्टर इतके आहे. शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकºयांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी, युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकºयांना युरिया कमी पडणार नाही; मात्र जमिनीचा पोत चांगला राहावा, यासाठी शेतकºयांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
थकबाकीचा विचार न करता पीक कर्ज द्यावे!जे जे शेतकरी मागणी करतील, त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँका व बँकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही ना. भुसे यांनी यावेळी दिला. त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाºयांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ना. भुसे यांनी दिले.