बाळापूर (अकोला): मोहरमनिमित्त शुक्रवारी रात्री बाळापूर येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणुकीत किरकोळ कारणावरून आपसात झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली,तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाणही झाली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्यासह पाच ते सहा कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना तातडीने अटक केली असून, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.बाळापूर शहरात १३ सप्टेंबर रोजी मोहरमनिमित्त सार्वजनिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मोहरमची मिरवणूक रात्री ९.४५ वाजता दरम्यान शहरातील जुन्या शासकीय रुग्णालयाजवळ आली होती. यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेल्या नौशाद खान डरमाईल खान रा.बाळापूर याचा मिरवणुकीतील इतर युवकांबरोबर वाद झाला. हा वाद मिरवणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पो. उप. नि विठ्ठल वाणी यांनी सहकाऱ्यांसह वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अब्दुल सलीम अब्दुल गफ्फार , इलियास खान ऊर्फ राजा काल्या, शोएब खान नासिर खान, हुसेन शहा रहिम शहा, हसन शहा रहिम शहा, नौशाद खान ईरमाईल खान इतर १० ते १५ लोकांनी कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांशी वाद घालून त्यांना लोटपाट केली, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंखे, पो.उप.नि. विठ्ठल वाणी, पो.ना. सलीम, पो.काँ. शकिल, पो. कॉं. प्रशांत, पो. कॉं. मयूर व इतर कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता, तसेच संजय शाह यांच्या घराचे काच दगडफेकीने फुटले. बंदोबस्तासाठी आलेले पोलीस निघून गेल्याने मोजकेच पोलीस घटनास्थळावर होते. त्यामुळे जमावाने त्याचा फायदा घेत पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठल वाणी यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अब्दुल सलीम अब्दुल गफ्फार, इलियास खान ऊर्फ राजा काल्या, शोएब खान नासिर खान , हुसेन शहा रहिम शहा, हरान शहा रहिम शहा, नौशाद खान ईरमाईल खान यांच्यासह इतर १० ते १५ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ३५३, ३३२, ३३६, ५०४ व सहकलम-१३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. (शहर प्रतिनिधी)