लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका एकरात निशिगंधा फुलांची शेती करून वर्षाला तब्बल १० लाख रुपयांचे उत्पादन कुंभारी येथील शेतकरी सुभाष हेडा व गजानन निलखन यांनी घेतले आहे.सध्या शेती व्यवसायात होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले असले तरी काही शेतकरी नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेत असल्याचेही समोर येत आहे. कुंभारी येथे सुभाष हेडा यांची बारा एकर शेती आहे. त्यांनी शेती पातूर येथील शेतकरी गजानन निलखन यांना सांभाळण्यासाठी दिली आहे. या शेतात पातूरच्या आंब्याचे रोप तयार करण्यात येत असून, तीन एकर मिरचीची लागवड करण्यात आली आहे, तसेच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादनही घेण्यात येते. निलखन यांनी या शेतात दोन वर्षांपूर्वी एका एकरात निशिगंधा फुलांच्या रोपांची लागवड केली. एका एकरामध्ये लागवड करण्याकरिता त्यांना १ लाख रूपये खर्च आला. या रोपांना ६० दिवसांनंतर फुले यायला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी त्यांना कमी उत्पादन मिळाले. दुसऱ्या वर्षी मात्र दररोज मोठ्या प्रमाणात फुले मिळायला लागली. या फुलांची अकोला व पुणे येथील बाजारात विक्री करण्यात येत आहे.दररोज फुलांची तोडणी करून त्याचे पॅकेट बनवून विक्री करण्यात येते. या फुलांना बाराही महिने मागणी असते. गणेशोत्सव, दुर्गा उत्सव व उन्हाळ्यात विवाह सोहळ्यांमध्ये फुलांना चांगला भाव मिळतो, तसेच निशिगंधाच्या एका रोपाचे तीन वर्षांत जवळपास २० कंद निर्माण होतात. या कंदांला मोठी मागणी असून, एका एकरात पाच लाख कंद निर्माण होतात. त्यामुळे तीन वर्षांनी शेतकºयाला एका एकरातूनच २५ लाख रुपये मिळणार आहेत.हैदराबाद, पुणे, नाशिकवरून येतात फुलेअकोल्याच्या बाजारात फुलांना मोठी मागणी असते. जिल्ह्यात फुलांची शेती करण्यात येत नसल्यामुळे अकोल्याच्या बाजारात हैदराबाद, पुणे व नाशिकवरून फुले आणण्यात येतात. प्रवास खर्च वाढत असल्यामुळे फुलांचे भावही वाढतात. पुणे किंवा नाशिकच्या बाजारात फुलांचा तुटवडा असला तरी अकोल्यात फुले येत नाहीत. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना फुले मिळत नाहीत.
फूल शेतीतून एका एकरात वर्षाला १० लाखांचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:54 PM