अकोला : दरवर्षी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मजुरीही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ होत आहे. अशातच केंद्र शासनाने रब्बी पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. त्यामध्ये गहू, हरभरा पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. उत्पादनखर्चात हजारांनी वाढ होत असताना हमीदरात मात्र ४० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
सध्या पेट्रोल, डिझेल दर गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना शेतीची मशागत, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र, शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात अत्यल्प वाढ होत आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत गहू पिकाला ४० रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला २०१५ रुपये असा भाव मिळणार आहे, तर हरभऱ्याला ५२३० रुपये म्हणजे यात केवळ १३० रुपयांची वाढ केली आहे. केवळ ४०,१३० रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
शेतीतज्ज्ञ म्हणतात...
सरकारने हमीदराचे आमिष दाखविणे बंद करणे गरजेचे आहे. किमान आधारभूत किमतीने शेतकऱ्यांना कधीही त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकत नाही. कारण, कोणतीही दराची हमी ही कमीत कमी असते. ती उत्पादनखर्चसुद्धा भरून काढू शकत नाही. सरकारने किमान आधारभूत किमतीची पद्धत ही रद्द करावी.
- ललित बहाळे
दरवर्षी मजुरी, खते, बी-बियाणे यांच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. त्या तुलनेत ही वाढ तोडकी आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढते, त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढतो. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाववाढ होणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रकाश मानकर
सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून, आकड्यांचा खेळ केला आहे. सिलिंडरचे भाव वर्षभरात १५० रुपयांनी वाढले आणि हमीभाव ४० रुपयांनी वाढत आहे. शेतकऱ्यांना न्याय न देण्याची सरकारची भूमिका आहे.
- प्रशांत गावंडे
शेतकरी म्हणतात...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे; परंतु दरवर्षी मजुरी १० टक्के, बियाणे व खते यांचे तर ३०-३५ टक्के वाढतात. त्या तुलनेत हमीदरात अत्यल्प वाढ होत आहे.
- बाळासाहेब रामचवरे, शेतकरी, रुस्तमाबाद
सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.
- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर
शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ४०, तर कुठे १३० रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये कीटकनाशके व खतेही वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.
- गणेश काळे, शेतकरी, तामशी