राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक तंत्रज्ञानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन भारत सरकारद्वारा प्रोत्साहित केल्या जाते. यावर्षी इंस्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीसाठी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, खंडाळा येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ईश्वरी गजानन गोलाईत हिच्या केळी पिकावर आधारित क्लीन इंडिया, वेस्ट फॉर बेस्ट या प्रोजेक्टची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. केळी कचऱ्यापासून पोटॅशियम निर्मिती करून फूल शेती संवर्धन करण्यासाठी विशेष करून प्रोजेक्टमध्ये दखल घेण्यात आली आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या खंडाळा परिसरात बहुसंख्य शेतकरी केळी या पिकांची लागवड करतात. केळी कटाईनंतर उर्वरित झाड व पाने, केळीची साल यांची विल्हेवाट योग्यरीतीने करून अन्नद्रव्य निर्मितीकरून फूलशेती व पिकांना पोषक घटक तसेच स्वच्छ भारत अभियानला हातभार लावण्यासंदर्भात प्रोजेक्टमध्ये सूचित करण्यात आले आहे. प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन परिसर व विज्ञान उपक्रम प्रमुख अध्यापिका सुरेखा हागे, गोपाल मोहे, निखील गिऱ्हे व वर्गशिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांना सातत्याने अध्ययनरत ठेवण्यासाठी रेडिओ खंडाळा, मोहल्ला शाळा, बोलक्या भिंती, स्वाध्यायमाला, कृतीपत्रिका, परिसर व विज्ञान असे विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. इन्स्पायर अवॉर्डसाठी प्रोजेक्टची निवड झाल्याने ईश्वरीचे केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव उपाध्यक्ष प्रशांत आंबुसकर, शिक्षण तज्ज्ञ दिनकर धुळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले यांनी कौतुक केले आहे.
-------------------------
विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीव जागृती व नवनिर्मितीसाठी विविध उपक्रम परिसर व नैसर्गिक घटकांचा उपयोग करून राबविले जातात.
-सुरेखा ब्रह्मदेव हागे, उपक्रम प्रमुख परिसर व विज्ञान