अकोला, दि. २३- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित लिंबाच्या विविध वाणांची व्यावसायिक उपयोगिता व आहारातील महत्त्व याबाबत गृहिणीद्वारे सोमवारी विशेष परीक्षण करण्यात आले. लोणच्याकरिता उपयुक्त लिंबू वाण महिलांच्या आहारातील पौष्टिक तत्त्वांची आवश्यकता या विषयावर शास्त्रज्ञांनीही उपस्थितांना महत्त्व पटवून दिले.अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (फळे) व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर सोमवारी तंत्रज्ञान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलिमा दाणी होत्या. आरडीजी महिला महाविद्यालयाच्याप्राचार्य डॉ. अंजली राजवाडे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, कीर्ती भाले यांच्यासह प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर यांची विशेष उपस्थिती होती. या कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या ह्यअकोला लाइमह्ण- ३ यासह इतर लिंबू वाणांचे परीक्षण गृहिणींनी केले व आपली मते नोंदविली. यावेळी नीलिमा दाणी यांनी महिलांमधील बहुतेक व्याधींना व आजारांना जंकफूडचे सेवन कारणीभूत असल्याचे सांगताना महिलांनी आहारात ताजा भाजीपाला तथा फळांचा समावेश करावा, असा सल्ला दिला. आहार तज्ज्ञ प्राचार्य डॉ अंजली राजवाडे यांनी महिलांच्या आहारातील पौष्टिक घटकांचे महत्त्व विशद करीत उपस्थित महिलांच्या शंकांचे समाधान केले.या कार्यक्रमाला परिसरातील तथा विद्यापीठ परिवारातील बहुसंख्य गृहिणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मेघा डहाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. डहाळे, डॉ. प्रेमलता चंदन, दिनकर वडाळ, संदीप आसोलकर, स्वाती खंडागळे, घाटे, गीते तथा उद्यानविद्या विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
लिंबू वाणांचे व्यावसायिक परीक्षण!
By admin | Published: January 24, 2017 2:45 AM