अकोला : विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा एप्रिल ते जून या कालावधीत आहेत. मात्र, बहुतांश प्राध्यापक वर्ग निवडणूकीच्या कामात व्यस्त आहेत. त्याचा थेट परिणाम परीक्षेवर पडणार आहे. ही बाब लक्षात घेता प्राध्यापकांच्या कामांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी विद्यापीठाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १ एप्रील ते १५ जून या कालावधीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत. परीक्षा कामांसाठी केंद्राधिकारी, मुल्यांकन, बाह्य, अंतर्गत परीक्षक तसेच परीक्षांसदर्भातील अनेक कामांसाठी विद्यापीठ परीक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक कामात शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत केल्यास विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांअभावी परीक्षेच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पूर्वीच न्यायालयाने शैक्षणिक कार्यात गुंतलेल्या कुठल्याही कर्मचाºयाला त्यांच्या शैक्षणिक कामाच्या वेळा पाहून निवडणुकीची जबाबदारी देऊ नये, असे निर्देश वारंवार दिले आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाºयांना निवडणूक कामापासून दूर ठेवावे, अशी मागणी विद्यापीठातर्फे निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे.