मूर्तिजापूर : दहशतवाद विरोधी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने ८ मार्च रोजी दुपारी येथील एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडावून मधून ३ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. या प्रकरणी आरोपी विशाल घोरसडे याला ताब्यात घेतले असून, विशाल घोरसडे याने मूर्तिजापूरच्या एमआयडीसीतील नवघरे यांच्या गोडावून मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री करिता आणून ठेवल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच विलास पाटील यांनी सकाळी ११.४० वाजता ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोचले. तिथे उपस्थित असलेल्या आरोपी विशालला विचारणा केली असता आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर कुलूप उघडून गोडावून मधून ११ पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला ३ लाख ५३ हजार ४०० रूपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू जप्त केला व आरोपीला ताब्यात घेतले. येथील स्टेशन विभागातील गुरुद्वारा रस्त्यावर रहाणाऱ्यां आरोपी विशाल राजेश घोरसडे(वय २२) वर भादंविच्या १८८, २७२ व २७३ तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायदा२००६ च्या २६(२),(i),(iv),२७(३)(d), (e) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रकरण शहर पोलीसांच्या सुपूर्द केले.
मूर्तिजापूरात साडेतीन लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 7:58 PM