अकोला: खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांना प्रचंड फटका बसला. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. दरम्यान, पशुंसाठी लागणाऱ्या चाऱ्यामध्येही घट झाल्याचे चित्र आहे. आगामी दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनाला भविष्यात चारा टंचाई भासू नये, यासाठी अकोला जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश निर्गमित केला.
चारा टंचाई व वाढलेल्या चाऱ्याचे दर पशुपालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्यास्थितीत पशुंचा सांभाळ करणेही कठीण झाल्याचे पशुपालकांनी सांगितले. ढेप, कडबा, कुटार यांचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यात यंदा जिल्ह्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तुट असल्याने खरीप हंगामातील पिकांना फटका बसला, त्याचबरोबर चाऱ्यावरही परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे. भविष्यात चाराटंचाईचे संकट भासू नये, यासाठी जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यामध्ये ९ लक्ष ५५ हजार ४५६ मेट्रीक टन चारा उपलब्ध असल्याची माहिती आहे. जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणल्यास भविष्यात चारा टंचाई भासणार नाही, असा अभिप्राय पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिल्याने त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे. या आदेशानुसार आगामी दोन महिने जिल्हाबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई आहे.