सिध्दार्थ आराख / बुलडाणा: डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांना भरचौकात गोळ्या घालून मारले तर, कलबुर्गी यांना घरात घुसून ठार केले. यावरून या लोकांची हिंमत किती वाढली हे स्पष्ट होते. यांना व्य क्ती नव्हे विचार संपवायचे आहेत त्यामुळे अशा संस्थावर केवळ बंदी घालून प्रश्न मिटनार नाही तर, अस्ती त्वात असलेल्या कायद्यानेच यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच याचं पीक दिवसेंदिवस फोफावत असल्याची खंत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली. अविनाश पाटिल बुलडाणा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते 'लोकमत' शी बोलत होते.
प्रश्न : दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिसवर काय परिणाम झाला ? संघटनेचे काम थांबले काय?
अजिबात नाही, उलट जोमाने काम सुरू आहे. नवीन तरूण या चळवळीत सहभागी झाले. ज्या कामाला आम्हाला पाच वर्ष लागत होते, ते काम दोन वर्षात झाले.एखाद्या चळवळीतील प्रमुख अचानक जातो, त्याचा धक्का निश्चित बसतो. पण आमचा कार्यकर्ता थांबला नाही, व्यक्ती गेल्याने चळवळ, त्याचा विचार कधीच थांबत नसतो, डॉक्टरांच्या हत्येनंतर तो अनुभव आम्हाला आला. नवीन युवक युवती सहभागी होताहेत. राज्यभरातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे.
प्रश्न : जादूटोना विरोधी कायद्याचा फायदा होत आहे काय? कायदा लागू झाल्यामुळे तुमचे काम संपले काय ?
फायदा नक्की होत आहे. हा कायदा लागू झाल्यापासून राज्यात २५0 खटले दाखल झाले. तर भंडारा आणि ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारांना शिक्षाही झाल्या. आमचे काम संपले नाही उलट काम वाढले. कोणताही प्रश्न केवळ कायद्याने सुटत नसतो तर, लोकांची माणसिकता बदलण्याची गरज असते. अंनिसच्या माध्यमातून मानसिकता बदलविण्याचे काम आम्ही करीत आहोत. आणि आमचे हे काम अविरतपणे सुरू राहणार आहे. आता त्याला अधिक गती आली आहे.
प्रश्न : सनातनची महानगरामध्ये ताकद वाढत आहे, ती रोखण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे?
अशा प्रवृत्तीसाठी सध्या वातावरण पोषक आहे. हे लोक समाजात विष पेरून पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याचे काम करीत आहेत. मात्र, ते कदापिही शक्य नाही. दाभोळकर, पानसरे, कु लबर्गी यांची हत्या झाली म्हणून त्यांचा विचार संपला नाही.अशा प्रवृत्ती समाजाला कशा घातक आहेत हा विचार आम्ही समाजात पेरत ओहोत.
प्रश्न : आम्ही दाभोलकर हा नारा देवून तरूणाई पुढे येत आहे. ही फॅशन आहे की खरच युवक सहभागी होत आहे?
डॉक्टरांच्या हत्येनंतर अंनिसची चळवळ नेमकी काय आहे हे अनेकांना कळाले. त्यामुळे नव्याने युवक - युवती या चळवळीत सहभागी होत आहेत हे सत्य आहे. यात काही हौसे पण असू शकतात पण, चळवळीत काम करणारा खरा कार्यकर्ताच शेवटपर्यंत चळवळीत राहतो. हौसे कार्यकर्ते आपोआप बाहेर पडतात. आम्ही दाभोळकर चा नारा देत राज्यभर मोठय़ा प्रमाणावर जाणीव जागृती युवकांनी केली. ती पुढेही सुरू राहणार आहे.
प्रश्न : कॉ.पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक झाली. दाभोळकरांच्या खुनाच्या तपासाचे काय ?
कॉ.पानसरे हत्या प्रकरणात सनातनच्या कार्यकर्त्याला अटक झाली असली तरी त्याच्यावर अद्याप आरोप सिध्द झाला नाही. पोलिस सर्व शक्यता तपासून पुरावे जमा करत आहेत. याच धर्तीवर पोलिस डॉ. दाभोलकरांच्या हत्याराला पकडतील अशी आशा आम्हाला आहे. कारण डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे आणि कुलबर्गी यांच्या हत्या अत्यंत नियोजनब्ध प्रकारे करण्यात आल्या आहेत. तिघांच्याही हत्येचे सुत्र समान आहे. पोलिस निश्चित तपास लावतील.
प्रश्न : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कामकाज कसे चालते?
केंद्रीय कार्यकारीणी कंट्रोलींगचे काम करते. राज्यभरातील जिल्हा समित्यांना वेळोवेळी केंद्रीय कार्यकारिणी कार्यक्रम देते. विविध सण, उत्सव काळात अंधश्रध्देला उधाण येते अशा वेळी बुवाबाजी, जादूटोना विरोध कार्यक्रम सादर करून लोकांनमध्ये जागृती करण्याचे काम स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते करीत असतात. यामध्यमातून जागृती केल्या जाते.