अकोला : पातूर तालुक्यातील सिंचन विहिरी घोटाळा प्रकरणात खातेचौकशी सुरू असलेल्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषद प्रशासनाने पदोन्नती दिली. या प्रकाराने प्रशासन अडचणीत येऊ शकते, अशी उपरती झाल्याने संबंधित ग्रामसेवकाने या पदोन्नतीचा फेरविचार करावा, असा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचवेळी निलंबित दोन ग्रामसेवकांना पदस्थापनेचा आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामसेवकांना पदोन्नती दिली आहे. ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात पातूर पंचायत समितीमध्ये कार्यरत ग्रामसेवक एल. एम. पल्हाडे यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. बाळापूर पंचायत समितीमध्ये नियुक्ती देण्यात आली. हा प्रकार नजरचुकीने झाल्याचे पल्हाडे यांनी अर्जात म्हटले आहे. पातूर पंचायत समिती अंतर्गत सिंचन विहीर घोटाळा प्रकरणात त्यांची खातेचौकशी सुरू आहे. त्यामुळे पदोन्नती देणारे जिल्हा परिषद प्रशासन अडचणीत येऊ शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत पदोन्नतीचा विचार करावा, असा अर्ज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.अकोट पंचायत समितीमध्ये कार्यरत निलंबित ग्रामसेवक आर. ए. जटाळे यांना खातेचौकशीच्या अधीन राहून बाळापूर पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील निलंबित ग्रामसेवक आर. एन. पाटेखेडे यांना बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे.