अकोला : जिल्हा पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या तसेच ठाणेदारकी यशस्वीरीत्या सांभाळत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून माहिती मागविण्यात आली असून, त्यांना लवकरच पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत.जुने शहर पोलीस स्टेशनसारख्या अतिसंवेदनशील पोलीस ठाण्याचा यशस्वीरीत्या कारभार सांभाळल्यानंतर उरळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सतीश पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याची जबाबदारी आल्यानंतर ती योग्यरीत्या पार पाडणारे किशोर शेळके, दहीहांडा येथे यशस्वी कार्यकाळ काढल्यानंतर माना पोलीस ठाण्यात विविध उपक्रम राबवून सकारात्मक पोलिसिंग राबविणारे भाऊराव घुगे, अकोटसारख्या संवेदनशील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या व कामकाज सांभाळत असलेल्या शुभांगी दिवेकर, सायबर क्राइममध्ये कार्यरत असलेल्या सीमा दाताळकर, वाडेगाव पोलीस चौकीतील वैभव पाटील, पिंजर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले नंदकिशोर नागलकर, दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले तपन कोल्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले बाबाराव अवचार या नऊ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर लवकरच पदोन्नती मिळणार आहे. यासाठी आवश्यक ती माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविण्यात आली असून, त्यांच्या पदोन्नतीचा आदेश लवकरच निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.