अकोला: जिल्ह्यातील चारपैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चित्र आहे. ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’चा पुरस्कार करणाºया शहरातील काही व्यापाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत भाजपच्या विरोधात प्रचार केला. इथपर्यंतच न थांबता निवडणुकीत सक्षम उमेदवाराला मतदान न करता ‘नोटा’चे बटन दाबण्यासाठी आवाहन केले. या मुद्यावरून शहरातील प्रतिष्ठित व दिग्गज व्यापाºयांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित व्यापाºयांना चांगलेच खडेबोल सुनावल्याची माहिती आहे.अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या आत्मविश्वासाला तडा गेल्याचे समोर आले आहे. या मतदारसंघाला भाजपचा अभेद्य गड मानल्या जाते. मागील २५ वर्षांपासून या मतदारसंघातून गोवर्धन शर्मा मतांच्या मोठ्या फरकाने विजयी होत आहेत. २०१४ मधील मोदी लाट आणि त्यानंतर २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर यंदा विधानसभा निवडणुकीचे मैदानही अगदी सहज काबीज केल्या जाईल, असा प्रचंड आत्मविश्वास पक्षाच्या स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात होता. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी शेवटच्या फेरीपर्यंत भाजपला कडवी झुंज दिल्याचे समोर आले. ऐन शेवटच्या दोन फेरीत गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या २ हजार ५२३ मतांनी निसटता विजय झाला असला तरी या विजयामुळे भाजपची दिवाळी गोड झाली नसल्याचे समोर आले. या निकालामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. असे असले तरी भाजपच्या विजयी उमेदवारांसाठी शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी संघटनेने टिळक मार्गावरील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’चा पुरस्कार करणाºया काही व्यापाºयांनी निवडणुकीच्या कालावधीत अकोलेकरांना ‘नोटा’चे बटन दाबण्याचा पर्याय सुचवला, यावर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच उपस्थित व्यापाºयांना चांगल्याच कानपिचक्या दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.नगरसेवक, बुथ प्रमुखांचा हात आखडताएरव्ही दिवसभर सर्व्हिस लाइनमध्ये उभे राहून साफसफाईच्या कामांचा आव आणणाºया नगरसेवकांनी तसेच बुथ प्रमुखांनी मतदानाच्या दिवशी मतदारांना घरोघरी जाऊन आवाहन करण्यात हात आखडता घेतल्याची परिस्थिती अकोला पश्चिम मतदारसंघात होती. संबंधितांच्या या कौतुकास्पद कामाचे पक्षाकडून मूल्यमापन होऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडेल का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
मोदींच्या सभेनंतर बैठकांना विराम?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १६ आॅक्टोबर रोजी पार पडलेल्या जाहीर सभेनंतर भाजपच्या गोटात उत्साह संचारला होता. त्यामुळे मतदारांना गृहीत धरत अनेक ठिकाणच्या कॉर्नर बैठकांना पूर्णविराम दिल्याची चर्चा खुद्द पक्षातच रंगली आहे.