अकोला : बळिराजाला त्रास होणार नाही, सध्याच्या महामारीच्या काळामध्ये त्याला वणवण फिरावे लागणार नाही, लागेल तेवढे त्याला सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायिक पद्धतीने व पुरेशा प्रमाणात सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक यांना प्रत्यक्ष भेटून केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत येत असलेल्या अडचणींची माहिती दिली.
आ. रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेटून महाबीजचे व्यवस्थापक संचालक रेखावार यांची साेमवारी भेट घेतली. यावेळी आ. सावरकर यांनी सविस्तर चर्चा केली. सुमारे ५० हजार हेक्टरवर सोयाबीन पीक पेरणीचे नियोजन करून दोन लाख पाच हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून, ते महाबीजकडून स्पष्ट करण्यात आले. यापैकी एक लाख ६७ हजार क्विंटल बियाणे महाबीज भागधारकांकडून संकलित करण्यात आले असून, उर्वरित ५८ हजार क्विंटल बियाणे बाजारातून खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाबीजने सांगितले. सोयाबीन बियाणे वाटप करण्यासाठी सुमारे एक हजार महाबीज बियाणे वितरक नेमण्यात येऊन डीबीटी प्रणाली वगळता एक लाख ४७ हजार क्विंटल बियाणे वितरकांमार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येईल, असे बियाणे महामंडळाने सांगितले असले तरी सदर बियाणे प्रत्यक्षात कशा प्रकारे वाटप केले जाईल याची सुनिश्चिती केल्याशिवाय बियाण्याचे न्यायिक वाटप केले जाणार नाही. त्यामुळे त्याचे नियोजन करण्याच्या सूचना आ. सावरकर यांनी दिल्या. यावेळी तेजराव पाटील थोरात, माधव मानकर, शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, राजेश बेले, ज्ञानेश्वर कडू, जयकुमार ठोकळ, आदींसह महाबीजचे डॉ. प्रफुल लहाने, विपणन विभागाचे शाम दिवे, प्रशांत पागृत उपस्थित होते.