अकोला: जिल्हयातील चार तालुक्यांत पाणीटंचाई निवारणासाठी १३ उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्हयातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीकरिता पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यास दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुषंगाने कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर व अकोला या चार तालुक्यांतील १३ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि ५ तात्पुरत्या पूरक नळ योजना अशा एकूण १३ उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.