शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे वारंवार समाेर येत असतानाच या गुन्हेगारांचे कंबरडे माेडण्यासाठी खमक्या पाेलीस अधिकाऱ्याची गरज असल्याची ओरड सुरू झाली हाेती. त्यामुळे १० महिन्यांपूर्वी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची नागपूर येथून अकाेल्यात बदली करण्यात आली. त्यांनीही पाेलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारताच गुन्हेगारांचा सफाया करण्याची माेहीम हाती घेतली. अकाेला पाेलीस दलाच्या इतिहासात कधी नव्हे एवढ्या कारवाया त्यांनी गुन्हेगारांविरुध्द करून त्यांचे कंबरडे माेडण्याचा विळाच उचलला. त्यानुसार जिल्ह्यातील २५ टाेळ्यांमधील ११० पेक्षा अधिक गुन्हेगारांना दाेन वर्षांसाठी जिल्हाबाहेर पाठविण्यासाठी या गुंडांची हद्दपारी केली. त्यानंतर १०२ जणांचे तडीपारीचे प्रस्ताव पाठविला. तर १५ जणांवर एमपीडीएची कारवाई करून अवैध धंदे चालकांना पळताभुई थाेडी केली आहे. यासाठी अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम व स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेष सपकाळ यांनीही पाेलीस अधीक्षकांना अपेक्षित असलेली कामगिरी केली.
१८० शस्त्र तस्करांकडून ६०० शस्त्रे जप्त
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रुजू झाल्यानंतर त्यांनी शस्त्रांची अवैधरीत्या तस्करी करणाऱ्यांचा बिमाेड करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १७९ शस्त्र तस्करांवर कारवाई करीत सुमारे ६००पेक्षा अधिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये तलवार, खंजीर, देशी कट्टा, पिस्तूल, चाकूसह विविध शस्त्रांचा साठा आहे. या शस्त्र तस्करांवर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली आहे.