मनपा आयुक्तांची स्वाक्षरीच नाही
अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीसाठी निवड केलेल्या १६ सदस्यांच्या प्रस्तावावर मनपा आयुक्त अजय लहाने यांनी अद्यापही स्वाक्षरी न केल्यामुळे हा प्रस्ताव नगर सचिव विभागात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रस्तावावर शुक्रवारी स्वाक्षरी झाल्यास तो विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. महापालिक ा स्थायी समितीचे गठन करण्यासाठी १५ एप्रिल रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध पक्षांतील १६ सदस्यांची तसेच महिला व बालकल्याण समितीसाठी नऊ सदस्यीय महिलांची निवड करण्यात आली होती. सभेने सदस्य निवडीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर तो विभागीय आयुक्तांकडे सादर करावा लागतो. विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर स्थायी समितीच्या सभापती पदाची आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होतो. दोन्ही समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता सभापती कोण, यासाठी अकोलेकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सदस्य निवडीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने अमरावती येथे विभागीय आयुक्तांकडे सादर केला किंवा नाही, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. १५ एप्रिल रोजी सभेत स्थायीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर तो प्रस्ताव प्रशासनाने पुढील मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविणे अपेक्षित होते; परंतु प्रस्तावावर महापालिका आयुक्त अजय लहाने यांची स्वाक्षरी न झाल्यामुळे प्रस्तावाचे घोडे अडल्याची माहिती आहे. शुक्रवारी स्वाक्षरी होणार?मनपा स्थायी समितीच्या १६ आणि महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या प्रस्तावावर महापालिका आयुक्त अजय लहाने यांची येत्या शुक्रवारी स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल. ‘स्थायी’च्या सभापती पदासाठी चुरसस्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चुरस आहे. यामध्ये बाळ टाले, अजय शर्मा, सुनील क्षीरसागर, हरीश आलिमचंदानी यांच्या नावाची चर्चा आहे. महिला व बालकल्याणची धुरा जयस्वालकडे?महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जाणाऱ्या व प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची धुरा प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका सारिका टोलू जयस्वाल यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. ऐनवेळेवर दीपाली प्रवीण जगताप यांचे नाव समोर येऊ शकते.