मनपा प्रशासनाने २००४ पासून बिंदू नामावली अद्ययावत केली नव्हती. ऑगस्ट २०१५ मध्ये अनुसूचित
जाती जमाती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष सी.एस.थूल यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे निर्देश मनपाला दिले होते. त्या अनुषंगाने तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सर्वप्रथम बिंदू नामावलीचा विषय हाती घेतला. तेरा
वर्षांपासून बिंदू नामावलीचा विषय जाणीवपूर्वक थंड बस्त्यात ठेवल्याने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसह
विविध पदांचा अनुशेष निर्माण झाला. यामुळे पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग,नगर रचना विभागाच्या
माध्यमातून होणारी कामे प्रभावित झाली. तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पाहता
मानधनावरील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. शिवाय, नियमबाह्य पदोन्नतीद्वारे अनेक कर्मचाऱ्यांनी
महत्वाच्या पदांवर कब्जा करून ठेवल्याने पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. याप्रकरणी
अनेकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मनपाचा प्रशासकीय कारभार ताळ्यावर
आणण्यासाठी बिंदू नामावली अद्ययावत करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात घेता सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार केला. या विभागाने चार
जानेवारी २०१६ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यावेळी सरळ सेवा पद भरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली. त्यानंतर आता अनुकंपासाठी पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचा मुद्दा उपस्थित झाला असता नियुक्ती देण्यापूर्वी मनपातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली अद्ययावत करण्याचा निर्णय मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला हाेता. हा प्रस्ताव विभागीय आयुक्त स्तरावर थंड बस्त्यात असल्याची माहिती आहे.
९२० पदे मंजूर
मनपात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ९२० पदे मंजूर आहेत. यापैकी ४१० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. अनुकंपासाठी पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली अद्ययावत करणे क्रमप्राप्त आहे. मनपाने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केल्यावर या विभागाने ३१ जणांच्या नियुक्तीमध्ये त्रुटी काढल्या हाेत्या. त्या मनपाने दूर केल्याची माहिती आहे.