- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे गत महिन्यात पाठविण्यात आला आहे.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अकोला तालुक्यातील ६० गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. ६० गावांच्या या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी आणि गावागावांतील जलकुंभ शिकस्त झाले आहेत. जलवाहिनीला ठिकठिकाणी वारंवार गळती (लिकेज) लागत असून, अनेक गावांमधील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६० गावांना नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना दहा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने, ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खांबोरा ६० खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘मजीप्रा’च्या अकोला उपविभागीय कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेला ६१ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांमार्फत गत आॅक्टोबरमध्ये ‘मजीप्रा’च्या मुख्य कार्यालयाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर या योजनेच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होणार आहे.प्रस्तावित अशी आहेत कामे!खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींच्या प्रस्तावात प्रामुख्याने पाणी पुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकणे, पाणी वितरणासाठी नवीन जलकुंभांची निर्मिती करणे, पाण्याची उचल करण्यासाठी नवीन पंप बसविणे इत्यादी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.दररोज पाणी पुरवठ्यासाठी ‘पुनरुज्जीवन’चा प्रस्ताव!खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी आणि जलकुंभ शिकस्त झाल्याने, योजनेंतर्गत गावांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.