अकोला : ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्युत पुरवठ्याची सोय तसेच वर्गखोल्यांमध्ये उजेड करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रकाशमान योजनेतून जिल्ह्यातील शाळांसाठी ६ कोटी ५३ लाख रुपये मंजूर करावे, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यास १,७७२ वर्गांमध्ये उजेड पडणार आहे.ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये वीज पुरवठ्याचीही सोय नाही. तसेच विद्यार्थी बसत असलेल्या खोल्याही अंधाºया आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. ही बाब आरोग्य विभागानेही निदर्शनास आणून दिली आहे. त्यातच मतदान प्रक्रियेसाठी शाळांमध्ये प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूकीपूर्वी निवडणूक विभागाने केलेल्या सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसलेल्या मतदान केंद्राची यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली होती. त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्याचेही बजावले होते. त्यावेळी तात्त्पुरती सोय म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर आता कायमस्वरूपाची उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये विद्युत पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच शाळेतील सर्वच वर्गखोल्यांमध्ये प्रकाशव्यवस्था केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी शिकत असलेले वर्ग लखलखणार आहेत. या कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्ताव तयार केला आहे. बांधकाम विभागाने खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. त्यानुसार प्रत्येक खोलीसाठी ३६,८७० रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये असलेल्या १,७७२ वर्ग खोल्यांसाठी एकूण खर्चाचे अंदाजपत्रक ६ कोटी ५३ लाख ३३,६४० रुपये एवढे आहे. शाळांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रकाशमान योजना सुरू आहे. त्या योजनेतून हा निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी २० जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांना सादर केला. मंजुरीनुसार हा निधी खर्च होणार आहे.