अकोला: महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता तथा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासोबतच त्यांना पुरविण्यात आलेल्या सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मंजूर करण्यात आला. महापौर विजय अग्रवाल यांच्या सूचनेनुसार मतदान घेण्यात आले असता साजीद खान यांच्या समर्थनार्थ ८० नगरसेवकांपैकी १८ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. या मतदान प्रक्रियेवर काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला आहे.महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या विरोधात सभागृहात तीन चतुर्थांश मतदान होणे गरजेचे आहे. मंजूर प्रस्तावावर अपात्रतेची कार्यवाही व्हावी, यासाठी भाजपने गुरुवारी मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले होते. हा विषय पटलावर येताच काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होणे गरजेचे आहे. सभागृहात अनेकदा नगरसेवक संतप्त होतात, माईकची फेकाफेक होते. ५ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेत घडलेल्या प्रकाराबद्दल साजीद खान यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. त्यामुळे महापौरांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती डॉ. जिशान हुसेन यांनी केली. सत्ताधाऱ्यांना हा विषय घ्यायचा असेल, तर त्यांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार तीन महिन्यांच्या आत प्रस्तावात फेरबदल करता येत नाही. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नाही. मतदानासाठी तीन चतुर्थांश (८० पैकी ६१ सदस्य) नगरसेवकांनी मतदान करणे अपेक्षित असून, याप्रकरणी पुनर्विचार व्हावा, अशी विनंती डॉ. हुसेन यांनी महापौरांना केली. यावेळी काँग्रेस नगरसेवक अॅड. इक्बाल सिद्दिकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, फैय्याज खान, भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव व किरण बोराखडे यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.
साजीद खान पठाण यांच्याविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:54 PM