लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले.पाच वर्षांचा कालावधी संपणार्या जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना, अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोच पावती जोडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे. गत १५ सप्टेंबरपासून जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवार, २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३0 वाजेपर्यंत असून, या वेळेपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.
उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस!जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस असल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हय़ातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची झुंबड होणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत आहे. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत (प्रिंट) तहसील कार्यालयातील संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करण्याची वेळ दुपारी ४.३0 वाजेपर्यंत आहे.
नियोजन करण्याचे निर्देश!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शुक्रवारपर्यंंत केवळ २0 टक्के उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित ८0 टक्के उमेदवारी अर्ज मुदतीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दाखल होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारणे, पोलीस बंदोबस्त, वाहनांची पार्किंंग व्यवस्था इत्यादी दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
सहाव्या दिवशी हजारावर अर्ज दाखल!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी गुरुवारी जिल्हय़ातील सहा तालुक्यांत १ हजार ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात सरपंच पदांसाठी- १९ व ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी- ८७, अकोट तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५८ व सदस्य पदांसाठी- १९९, मूर्तिजापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ७७ व सदस्य पदांसाठी- १७३, बाळापूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ४३ व सदस्य पदांसाठी- ७८, बाश्रीटाकळी तालुक्यात सरपंच पदांसाठी- ५६ व सदस्य पदांसाठी- १५७, पातूर तालुक्यात सरपंच पदांसाठी- ३१ व सदस्य पदांसाठी- ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अकोला तालुक्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांंची माहिती रात्री उशिरापर्यंंत प्राप्त होऊ शकली नाही.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले.-एस.आर. कदम,उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती.