अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी व कावड महोत्सव साजरा करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याने, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती गठित करून, या समितीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा. त्यावर मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शिवभक्त मंडळांच्या बैठकीत शनिवारी दिली.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ६ सप्टेंबर रोजी अकोला शहरात पालखी व कावड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शहरातील शिवभक्त मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाइक, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह शहरातील शिवभक्त मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना काळात शहरातील पालखी-कावड महोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करून महोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी यावेळी केले. तसेच नियमांचे पालन करून कावड व पालखी महोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. पालखी-कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती नेमून या समितीने सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, त्या प्रस्तावावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी अशी केली मागणी!
पालखी-कावड महोत्सवात शहरातील सर्व १६० पालखी आणि कावड काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी या बैठकीत केली. कावड पालखी महोत्सव साजरा करण्याची तयारी शिवभक्त मंडळांकडून सुरू करण्यात आली आहे. नियमांचे पालन करून पालखी कावड काढण्याची परवानगी देण्याची मागणी तरुण बगेरे यांनी केली. तसेच कावड-पालखी श्रद्धेचा विषय असून, नियमांचे पालन करून या महोत्सवाला परवानगी देण्याची मागणी सागर भारुका यांनी केली. शिवभक्तांच्या आस्था व परंपरेचा विचार करून पालखी-कावड महोत्सवासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी एका शिवभक्ताने केली.