सत्यशील सावरकरतेल्हारा, दि.२ - तेल्हारासह अकोट उपविभागातील वाढती पाणीटंचाई पाहता यावर कायम उपाययोजना करण्यासाठी आ. प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाई आढावा बैठक बोलावली होती. मतदारसंघातील १५९ खेडी पाणीपुरवठा योजना वान प्रकल्प हनुमान सागरमधून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत पुढाकार घेतला होता; परंतु तब्बल दीड वर्ष उलटूनसुद्धा याबाबत कोणतीच प्रगती झाली नाही. त्यामुळे, या योजनेचे घोडे अडले कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.सूर्याने आग ओकण्याअगोदरच तेल्हारा तालुक्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील १०४ गावांपैकी बहुतांश गावात पाणी पातळी खोल गेल्याने कूपनलिका आटल्या आहेत तर काही गावांमध्ये प्रशासनामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दहीगावसह परिसरातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने किडनीसारखी रुग्णसंख्या वाढली आहे. दरवर्षी तालुक्यात उन्हाळा लागला म्हणजे पाणी समस्या निर्माण होते. यावर कायम पर्याय म्हणून मतदारसंघातील बारमाही पाणी असणारे व दरवर्षी शंभर टक्के भरणाऱ्या हनुमान सागरातून पाणीपुरवठा करण्याचा पुढाकार आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपल्या पहिल्याच पाणीटंचाई आढावा बैठकीत दीड वर्षाअगोदर घेतला आहे.त्या अनुषंगाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वान धरणातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता आ. भारसाकळे यांनी १३ डिसेंबर २०१४ च्या पाणीटंचाई आढावा सभेमध्ये आलेल्या पाणीटंचाई समस्येवर चर्चा केली. तालुक्यातील गावांना अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतून नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे तसेच गावागावातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना बाधित झाल्याने पाणीटंचाई भासू लागली. परिणामी सदर गावांना राष्ट्रीय ग्रामीण योजना कार्यक्रमांतर्गत वान धरातून नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करून पाणीपुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींना उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी ग्रामसभांचे ठराव व प्रस्ताव मागितले होते. त्यावर ग्रामपंचायतीने ठरावसुद्धा दिले. यामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातील १५९ गावांची यादी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्तावित यादीसुद्धा करण्यात आली होती. या यादीत तेल्हारा तालुक्यातील ८४ गावे व उर्वरित अकोट तालुक्यातील गावांचा समावेश होता. प्रस्तावित यादीतील तेल्हारा तालुक्यातील फक्त चार गावांची पाणी करण्याचे पत्र पंचायत स्तरावर प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतर या योजनेत कुठलीच प्रगती किंवा ग्रामपंचायतींना कोणताच पत्रव्यवहार केला गेला नसल्याचे समजते. वान हनुमान सागरातून पाणीपुरवठा योजना ही मतदारसंघाकरिता जीवनदायी योजना असल्याने याबाबत गावागावांतील नागरिकांचे विशेष लक्ष आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुन्हा याबाबत आढावा बैठक बोलावून पाणीटंचाईचा प्रश्न शासन स्तरावरून कायमचा मिटवावा, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.
प्रस्तावित १५९ खेडी पाणीपुरवठा योजना रखडली!
By admin | Published: March 03, 2017 2:01 AM