अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हयात छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, जिल्हयात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे. प्रस्तावित मतदान केंद्रांच्या यादीवर येत्या १ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप व हरकती दाखल करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत शनिवारी देण्यात आली.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित जिल्हयात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. जिल्हयातील पाच विधानसभा मतदारसंघांत सध्या एकूण १ हजार ७०४ मतदान केंद्र आहेत. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांच्या नावातील बदलासाठी ६९ आणि विलीन (मर्ज) करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे ४ प्रस्ताव आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार संख्या झाल्याने ७ मतदान केंद्रांची आणि दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्याने ८ मतदान केंद्रांची अशी जिल्ह्यात एकूण १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे.
मतदान केंद्रांची प्रस्तावित वाढ धरुन , पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हयातील एकूण १ हजार ७१९ मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये २५ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. वाढीव प्रस्तावित मतदान केंद्रांच्या यादीसंदर्भात येत्या १ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सामन्य निवडणूक शाखेत आक्षेप व हरकती दाखल करता येणार आहेत. जिल्हयातील मतदान केंद्र वाढीचे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास प्रारुप मतदार यादीतही बदल अंमलात येेणार असून, त्याआधारे मतदान केंद्रांची पुनर्रचना व सुसुत्रीकरण अस्तित्वात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेच्यावतीने देण्यात आली.