वाशिम जिल्ह्यात पॅकेज ४ आणि पॅकेज ५, असे दोन टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे काम केले जात आहे. यात पॅकेज ५ मध्ये ४२.८७७ किमी अंतरात उड्डाण पूल, लघू पूल, आरओबी, व्हीओपी, व्हीयूपी, एलव्हीयूपी, कप आणि पीयूपी, डब्ल्यूओपी, पीओपी, बॉक्स रेल्वे आणि नवनिर्मिती मिळून ८३ रचना आहेत. त्यापैक ३२३ रचना पूर्ण झाल्या, तर ४३ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर पॅकेज ४ मध्ये ५४.३५६ किमी अंतरात १२६ रचना असून, त्यापैकी ७९ पूर्ण झाल्या, तर ३८ रचनांची कामे प्रगतिपथावर आहेत. जवळपास ७२१ किमी अंतराच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज्य शासनाची धडपड आहे. गत १ मे रोजीच या महामार्गातील काही भागांचे लोकार्पण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकले नाही. आता वाशिम जिल्ह्यात दोनद बु. ते जनुना खु. या दरम्यान प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि राज्य रस्ते विकास महामंडळाची मोठी कसरत सुरू आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही उड्डालपुलासह विविध कामे केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात ‘समृद्धी’चे काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:26 AM