लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनुष्याच्या अतिहव्यासामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा होत असलेला अतिरिक्त वापर, जागतिक तापमान वाढ, या व इतर कारणांमुळे निसर्गाचा समतोल ढळला आहे. त्यासोबतच पृथ्वीतलावरील जैवविविधतेलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. झपाट्याने नष्ट होत असलेली जैवविविधता कायम राहावी, यासाठी मनुष्याने विश्वस्त म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २२ मे रोजी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. यावर्षी जैवविविधता दिनाचे ब्रिदवाक्य ‘जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन’ हे आहे. राष्ट्रीय पातळीवर भारतातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात पक्ष्यांच्या सुमारे ४५,००० तर प्राण्यांच्या ८,१०० प्रजाती आढळून येतात. पर्यावरणातील बदल व इतर कारणांमुळे यापैकी अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. यामध्ये पृष्ठवंशी प्राण्यांच्या ३८४, माशांच्या २३, उभयचर २, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २१, पाठीचा कणा नसलेले ९८, पक्ष्यांच्या १३३, सस्तन ८३ अशा एकूण ७२४ प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी देशात राष्ट्रीय अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि १४ राखीव जंगले तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अभयारण्यांमध्ये जैवविविधताअकोला वन विभागाचे राखीव वनक्षेत्र ७७८ चौ. कि.मी. असून, या भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसून येते. जिल्ह्यात नरनाळा, काटेपूर्णा, सोहळ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये वाघ, बिबट, तडस, कोल्हा, लांडगा, सायळ, काळवीट, हरीण, नीलगाई व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पहावयास मिळतात. शहरात वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातीअकोला शहरात अत्यंत दुर्मीळ अशी वनस्पतींची जैवविविधता आढळते. यामध्ये भागवतवाडीजवळ असलेले वायूपर्णाचे वृक्ष, रेल्वे वसाहती जवळचे मिसवाकचे वृक्ष, राऊंड रोडवर कळंदाचे वृक्ष यांचा समावेश आहे. सूर्या गार्डन येथे राज्य वृक्ष जारुळ आहे. डॉ. पंदेकृविचे जंगल जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे सीता अशोक, हत्तीफळ व गोरव चिंच असे अत्यंत दुर्मीळ वृक्ष आहेत. मनुष्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. थोडे प्रयत्न केले, तर परिसंस्थेतील जैवविविधता कायम ठेवता येते. जैवविविधतेचे विश्वस्त म्हणून आपण त्यांचे रक्षण केले पाहिजे. - गोविंद पांडे, वन्य जीव व पर्यावरण अभ्यासक, अको
विश्वस्त म्हणून करा जैवविविधतेचे रक्षण!
By admin | Published: May 22, 2017 1:07 AM