अकाेला : रस्त्ये कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या प्रकरणात राज्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर कडू यांनी गुरूवारी अटकपूर्व जामिनासाठी अकाेल्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत दिलासा दिला आहे. या अंतरिम जामिनानंतर आता ९ मे राेजी सुनावणी हाेणार आहे.
जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३ डिसेंबर रोजी सिटी काेतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली होती. या याचीकेची दखल घेत न्यायालयाने बुधवार २७ एप्रिलच्या रात्री ना.कडू यांच्यावर गुन्हे दाखल केले हाेते.
या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून कडू यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली, मात्र, अटक पूर्व जामिनीवर निर्णय देण्यापूर्वी सरकार पक्षाची बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी ९ मे रोजी निश्चित केली आहे. तोपर्यंत बच्चू कडू यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे ९ मेपर्यंत पालकमंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. ना. कडू यांच्यातर्फे न्यायालयात ॲड. बी.के. गांधी बाजू मांडली.
पालकमंत्र्यांनी संविधानाचा सन्मान करायला शिकल पाहिजे. आज न्यायालयाचा जो निकाल आला त्याला सविस्तर वाचून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. ज्या न्याय व्यवस्थेला बच्चू कडू यांनी दोष दिले त्याच न्याय व्यवस्थेने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे, हे लक्षात ठेवावे.- डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी