अकोला : आम आदमी पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च राेजी ईडीने अटक केली असून या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात इंडिया गठबंधनच्या वतीने शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकासमाेरील धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आराेप यावेळी करण्यात आला.
ईडी या स्वायत्त संस्थेचा भाजपच्यावतीने घरगडी सारखा वापर होत असल्याचाही आराेप करण्यात आला आहे. देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात असल्याचे निवेदनात नमुद आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी व काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ऊपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक कैलास प्रांणजळे, महानगर संयोजक हाजी मसूद अहमद, ज्ञानेश्वर साकरकार, प्रदिप गवई, दर्पण खंडेलवाल, आकिब खान, गोपनारायण जी, रफीक भाई , हामिद भाई, अरविंद कांबळे, विजय चक्रे, काजी लायक अली, संतोष दाभाडे, सागर प्रांणजळे यांचेसह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, साजिद खान पठाण सह काँग्रेसचे कार्यकर्ते व इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.