अकोला : केंद्र सरकारने केलेल्या घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध करीत, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस सिलिंडरची पूजा आणि आरती करून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारकडून दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात येत असून, उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीला विरोध दर्शविण्यात आला. या आंदोलनादरम्यान गॅस सिलिंडरची पूजा करण्यात आली तसेच आरती करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार विरोधात घोषणा देत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांच्यासह प्रदेश सरचिटणीस छाया कात्रे, सुनीता सावळे, अर्चना थोरात, वृंदा मंगळे, ॲड. जया जुनारे, डाॅ. सपना राऊत, सुनीता ताथोड, सुषमा राठोड, दीपमाला खाडे, उमा महल्ले, किरण पवार, मंगला कलोशिया, सानिका राजपूत, शबनम खान, आलियाखान, तराणा इंगळे, आदी पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.