अकोला : आरोग्य विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाचा निषेध करत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला शाखेच्या डॉक्टरांनी त्यांच्या नोंदणी पत्राची (रजिस्ट्रेशन ) प्रतीकात्मक होळी केली. १० सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राज्य सरकारचे धोरण हे डॉक्टरांच्या विरोधात असून, वेगवेगळे कायदे डॉक्टरांवर लादण्यात येत आहे. दरम्यान, ३१ आॅगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार लागू करण्यात आलेले दर रद्द करावे व जुनेच दर कायम ठेवावे, कोरोना संकटात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना सन्मानपत्र द्यावे तसेच ५० लाखांच्या मान्य केलेल्या विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी आयएमच्यावतीने करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या परिपत्रकाच्या सूचनांनुसार रुग्णालय चालविणे अवघड आहे. चार सप्टेंबर रोजीच्या आयएमएच्या बैठकीत अनुषंगिक परिपत्रक पूर्णपणे फेटाळण्यात आल्याचेही आयमएएच्यावतीने सांगण्यात आले. त्यानुषंगाने १० सप्टेंबर रोजी अकोल्यात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी झाले होते. दरम्यान, पुढील काळातही डॉक्टर आक्रमक आंदोलन करणार आहेत.