अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करीत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अकोला जिल्ह्याच्यावतीने शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या अकोला जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अकोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्याने, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे दिवसभर अकोला शहरासह जिल्हा थांबल्याचे दिसत होते. अकोला शहरातील जनता बाजार, किराणा मार्केट, काॅटन मार्केट, टिळक रोड आदी सर्वच भागात दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागात एरव्ही गर्दी होणाऱ्या भागात शुकशुकाट जाणवत होता. दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर अकोला जिल्हा थांबल्याचे चित्र दिसत होते.
राजकीय पक्ष अन् संघटनांचा पाठींबा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद !जिल्हा बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विविध जातीधर्माच्या संघटना, व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालयांच्या संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी व व्यावसायिक संघटना आदी संघटनांनी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या अकोला शहर व जिल्हा बंदला पाठींबा देण्यात आला. त्यामुळे जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘एक मराठा लाख मराठा’चा नारा अन् रॅलीने दणाणले अकोला शहर!सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अकोला जिल्हयाच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अकोला शहरातील स्वराज्य भवन येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन, दुर्गा चौक, सिव्हील लाइन चौक, नेहरु पार्क, तुकाराम चौक, कौलखेड चौक, सिंधी कॅम्प, अशोक वाटीका आदी भागात मार्गक्रमण करीत बंदचे आवाहन करण्यात आले. ‘एक मराठा लाख मराठा ’ असे नारे देत काढण्यात आलेल्या रॅलीने अकोला शहर दणाणले होते. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली पोहाेचली. या रॅलीत सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चासह जिल्हयातील विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.