अकोला : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)ला देशभरातून विरोध होत असताना, या विरोधाचे लोण अकोल्यातही पोहचले आहे. सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी मुस्लिम समाजाची जाहीर सभा अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर होत आहे. तहफ्फुजे शरीयत कानुन कमेटी द्वारा आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेला जिल्हाभरातून मुस्लिम बांधव जमले आहेत. क्रिेकेट क्लब मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज एकत्र आला असून, या सभेला मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. क्रिकेट क्लब मैदानावर एकत्र येण्यापूर्वी मुस्लिम समाज बांधवांनी शहरातून विशाल मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या या मोर्चात नागरिकांनी सीएए आणि एनआरसीचा विरोध करणाऱ्या घोषणा दिल्या. तसेच हातात बॅनर व फलक घेऊन या कायद्याचा निषेध व्यक्त केला. सद्या क्रिकेट क्लब मैदानावर सभा सुरु असून, हजारोच्या संख्येने मुस्लिम समाजबांधव गोळा झाले आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आली आहे. शहरातील काही भागात व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली असून, अघोषित संचारबंदीसारखे वातावरण आहे.