जिल्ह्यातील काही तालुक्यांत जनावरे दगावण्याचे प्रकार समोर आले होते. मुख्यत: तेल्हारा तालुक्यातील जाफरापूर या गावात पंधरा दिवसात १२ जनावरे दगावली होती. आधीच कोरोनाचे संकट, आता जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता वाढली होती. पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने या मृत जनावरांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या जनावरांचा मृत्यू प्रोटोझोअल रोगामुळे झाल्याचा पशुसंवर्धन विभागाने प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आजारी जनावरांवर उपचार सुरू झाले होते. या जनावरांच्या नमुन्यांचा अहवाल पुणे प्रयोगशाळेतून नुकताच प्राप्त झाला आहे. जनावरांचा मृत्यू प्रोटोझोअल रोगामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
--बॉक्स--
प्रोटोझोअल रोगामुळे असे होतात परिणाम
प्रोटोझोअल रोग गोचिडांमुळे होणारा आजार आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हा परजीवी रोग आहे. हा आजार झालेल्या जनावरांना आठ दिवसात उपचार मिळणे गरजेचे असते असते, असे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
--बॉक्स--
जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच
प्रोटोझोअल रोगामुळे जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही एक-दोन जनावरे दगावत आहेत. उन्हाच्या दिवसांमध्ये या रोगाचा प्रसार अधिक होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.