अकाेला : माँ साहेब जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने १२ जानेवारी २०१५ला सिंदखेड राजा विकास आराखड्याची घोषणा केली होती. येत्या १२ जानेवारीला या घोषणेला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. पण, निर्धारित ११२ कोटी रुपयांपैकी विकासासाठी केवळ दीड कोटी रुपये नियोजन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंदखेड राजाच्या विकासासाठी जाहीर आराखड्यानुसार निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश संघटक रामेश्वर पवळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दोन वर्षांत या आराखड्यातील कामे पूर्ण होणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज पहिल्या टप्प्यातीलच कामे अपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या प्रस्तावानुसार आता ३ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीसाठी पर्यटन मंत्रालयाकडे नव्याने मागणी करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करून तत्काळ सिंदखेड राजाच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा पवळ यांनी व्यक्त केली आहे
११२ कोटींचा हा आराखडा मंजूर झाला. २५ कोटींच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शिखर समितीने मान्यता दिली. त्यातील १२.९६ कोटींच्या आराखड्यातील पाच कामांना पुरातत्त्व विभागाच्या (नागपूर) साहाय्यक संचालकांच्या अखत्यारीत मंजुरीही मिळाली. यामध्ये प्रामुख्याने राजे लखुजीराजे भोसले यांचा राजवाडा, नीलकंठेश्वर मंदिर, रंगमहाल व सावकारवाडा, काळाकोट या कामांचा समावेश होता. साडेसात कोटी रुपयांची कामेही सुरू झाली. राज्य पुरातत्त्व विभागाने नीळकंठेश्वर मंदिर परिसरात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र १२ पैकी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी कोणत्या खात्यात ठेवायचा यावरून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. नंतर निधीही मिळाला नाही. परिणामी, अजूनही पहिल्या टप्प्यातील कामे अपूर्ण आहेत यावर पवळ यांनी लक्ष वेधले आहे.