अकोला : शहरात नागरिकांच्या सुविधेसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले असले तरी कुशल मनुष्यबळाअभावी हाॅस्पिटल सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. काेराेनाच्या काळात वैद्यकीय सेवा प्रभावित झाली असून, अशा स्थितीत सदर हाॅस्पिटलसाठी मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात केली. मुंबई येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचा मुद्दाही आमदार बाजोरिया यांनी सभागृहात मांडला. रस्त्यांची कामे पूर्ण होण्याअगोदर कंत्राटदाराला देयके देण्यात आली असून, या कामांची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’गठीत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
अकोल्यात नाइट लॅन्डिंगची व्यवस्था करा !
पश्चिम विदर्भात अकाेला जिल्ह्याला लागूनच बुलडाणा, वाशिम, अमरावती जिल्हा आहे. जिल्ह्याचे भाैगाेलिक स्थान लक्षात घेता प्रवाशांच्या सुविधेसाठी येथील शिवनी विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाने विस्तारित धावपट्टीचे काम तसेच सर्व बाबींचा विचार करून आवश्यक त्या सूचना द्याव्या, असेही आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात स्पष्ट केले.