लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील मंजूर ११ सिंचन प्रकल्पांची कामे तीन वर्षांत नव्हे, तर एका वर्षात पूर्ण झाली पाहिजे, कामे पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्र्यांची असून, दम असेल तर सर्व सिंचन प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करून शेतकर्यांच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी लागणारे पैसे देण्यास मी तयार आहे, असे आव्हान केंद्रीय भूतल परिवहन व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना रविवारी दिले.अकोला शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासमोर आयोजित केंद्र शासन पुरस्कृत ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील अपूर्ण आणि रखडलेल्या ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ आणि चार महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी आत्महत्या करतात, ही दु:खाची बाब असून, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात ११ सिंचन कामांना मंजुरी देण्यात आली असून, हे प्रकल्प शेतकर्यांना संजीवनी देणारे ठरणार असल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील या सर्व सिंचन प्रकल्पांची कामे तीन वर्षात नव्हे, तर एक वर्षात पूर्ण झाली पाहिजे, असे जलसंपदा मंत्र्यांना उद्देशून सांगत, कामे पूर्ण करणार्या कंत्राटदारांना ७५ टक्के कामाची रक्कम दिली जाईल; मात्र, ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्र्जेदार होतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. दम असेल तर जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करून, शेतकर्यांच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी लागणारा निधी देण्यास मी तयार आहे, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. विदर्भात २५ लाख लीटर दूध गोळा करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानुसार दूध गोळा झाल्यास विदर्भातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत राज्य सरकारने कर्जमाफी केली असून, सिंचनाचा प्रश्न सुटतो आहे, अकोला जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगत विदर्भातील शेतकर्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील गडकरी यांनी यावेळी दिली. यावेळी जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव आय.एस. चहल, सी.ए. बिरासदार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, गांधीग्रामच्या सरपंच सुषमा ठाकरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे प्रकल्प संचालक ब्राम्हणकर यांनी तर संचालन प्रकाश अंधारे यांनी केले.कार्यक्रमाला जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाहीबळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची कामे सगळी शक्ती पणाला लावून तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे सांगत सन २0१९ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर द्यायचे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. घरांसाठी जिल्ह्यातील गरीब कुटुंबांची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले असून, जागा नाही म्हणून घर नाही, अशी अवस्था राहणार नाही. प्रत्येक गरीब कुटुंबाला घर मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पांची कामे पूर्ण करून शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविणार - महाजन जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अपूर्ण आणि रखडलेल्या ११ सिंचन प्रकल्पांची कामे बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत तीन वर्षांत पूर्ण करून शेतकर्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. मापदंड आणि निकष बाजूला ठेवून काटीपाटी प्रकल्पाच्या कामास मंजुरी देण्यात आली असून, पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास शेतकर्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बळीराजाची सुखाची पहाट उगवली; टेक्सटाइल प्रकल्प द्या- रणजित पाटीलजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासनाकडून १८२0 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही जिल्हावासीयांसाठी आनंदाची बाब असून, या प्रकल्पांमुळे जिल्हय़ातील बळीराजाची सुखाची पहाट उगवली आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मालाला योग्य दाम आणि शेतकर्यांच्या मुलांच्या हाताला काम मिळेल, असा जिल्ह्यासाठी ‘टेक्सटाइल’ प्रकल्प देण्यात यावा, अशी मागणीही डॉ. पाटील यांनी केली.
जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागावे - संजय धोत्रेसिंचन प्रकल्पांच्या कामांमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना जलसंजीवनी मिळाली आहे. काटीपाटी प्रकल्प मार्गी लागला आहे. असे सांगत अकोला शहरातील मोर्णा नदी शुद्धीकरण प्रकल्प मार्गी लागला पाहिजे, अकोट फैल भागातील शंभर वर्षांपूर्वीचा पूल शिकस्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर करण्यात यावा आणि जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागावे, अशी मागणी खासदार संजय धोत्रे यांनी यावेळी केली.
रेल्वे स्टेशन पुलाचे काम महामार्गात समाविष्ट!अकोला-अकोट मार्गावरील रेल्वे स्टेशनजवळच्या शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या पुलाचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या कामात समाविष्ट करण्यात येत असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली. या पुलाचे काम लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उड्डाण पुलासह चौपदरीकरणाची कामे दोन वर्षांंत पूर्ण करणार!अकोला शहरातील रेल्वे स्टेशन ते अशोक वाटिकापर्यंत उड्डाण पुलासह रस्त्याचे चौपदरीकरण तसेच जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६, शिवर ते पीकेव्ही चौक, नेहरू पार्क चौक ते दक्षता नगर चौक, निमवाडी चौक ते वाशिम रोड बायपास चौक व रिधोरा बायपास इत्यादी रस्ता चौपदरीकरणाची कामे दोन वर्षांंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ; चार महामार्ग कामांचे भूमिपूजन- बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ८२0 कोटी रुपयांच्या निधीतून ४ मध्यम व सात लघू सिंचन प्रकल्प, अशा एकूण ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ आणि १ हजार १११ कोटी ७२ लाखांच्या निधीतून चार महामार्गाच्या कामांचे भूमिपूजन गांधीग्राम येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
- ‘रिमोट’द्वारे या कामांच्या कोनशिलेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यामध्ये नेर धामणा बॅरेज, घुंगशी बॅरेज, काटेपूर्णा बॅरेज, उमा बॅरेज या चार मोठय़ा प्रकल्पांसह कवठा बॅरेज, काटीपाटी बॅरेज, शहापूर लघू पाटबंधारे प्रकल्प, शहापूर बृहद लघू पाटबंधारे प्रकल्प, पोपटखेड टप्पा- २ प्रकल्प, नया अंदुरा लघू पाटबंधारे प्रकल्प व वाई लघू पाटबंधारे प्रकल्प इत्यादी सिंचन प्रकल्प आणि अकोला ते महान महामार्ग दुपदरीकरण, अकोला ते अकोट महामार्गाचे दुपदरीकरण, शेगाव ते देवरी फाटा महामार्गाचे दुपदरीकरण व अकोट ते अंजनगाव महामार्गाचे दुपदरीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे.