अकोला, दि. १0- जिल्हा परिषदेच्या सन २0१७-१८ यावर्षीच्या अंदाजपत्रकासाठी (बजेट) विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावांवर चर्चा करीत, अपेक्षित उत्पन्न आणि गरजेनुसार अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत शुक्रवारी घेण्यात आला.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय सभेत सन २0१७ -१८ या वर्षीचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत योजना आणि विकास कामांसाठी विविध विभागांकडून सादर करण्यात आलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावांवर विभागनिहाय चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या निधी मागणीच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. अपेक्षित उत्पन्न, उपलब्ध निधी आणि आवश्यकतेनुसार संबंधित विभागांना योजना आणि विकास कामांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्याचे या सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अर्थ समितीच्या या सभेला समितीचे सदस्य रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे, अक्षय लहाने, देवानंद गणोरकर, गीता लांडे, भीमराव पावले, भावना सदार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.उत्पन्न वाढविण्याचे निर्देश!जिल्हा परिषदमार्फत विविध योजना आणि विकास कामांसाठी सेस फंडातून निधी उपलब्ध व्हावा, त्यासाठी जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने उत्पन्न वाढविण्याचे निर्देश अर्थ समितीच्या सभेत संबंधित विभागांना देण्यात आले.
गरजेनुसार ‘बजेट’मध्ये करणार निधीची तरतूद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 2:10 AM