लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गत चार वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले; मात्र जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संगोपन व संरक्षणाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.सन २०१२ ते २०१६ या चार वर्षाच्या कालावधीत पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यानुषंगाने तालुक्यातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी गत एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. पातूर तालुका कृषी अधिकारी एस.बी. मकासरे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत विभागातील सहायक गटविकास अधिकारी अशोक पराते व रोहयो शाखेचे उपअभियंता पाणझाडे सदस्य होते. सन २०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या कालावधीत पातूर तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड आणि जिवंत असलेले वृक्ष व वृक्ष संगोपन आणि संरक्षणाच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी पंचनामे करून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीला दिला होता. त्यानुसार चौकशी समितीने गत मे अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करुन, ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. चौकशी अहवालानुसार तालुक्यात ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. तसेच जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संरक्षण व संगोपनाच्या मजुरीवर खर्च करण्यात आल्याने, तालुक्यात वृक्ष लागवडीवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढण्यात आला. त्यामुळे पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे.जबाबदार ठरणारे असे आहेत अधिकारी-कर्मचारी! पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीतील घोळासंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित ग्रामसेवक, ग्राम रोजगारसेवक, पॅनल तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी व सहायक लेखाधिकारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी जबाबदार ठरू शकतात, असे मत चौकशी समितीच्या एका सदस्याने व्यक्त केले.आता कारवाईकडे लागले लक्ष!पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, तालुक्यातील वृक्ष लागवडीत झालेल्या घोळाला जबाबदार ठरणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई येते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत घोळ!
By admin | Published: July 15, 2017 1:35 AM