लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऊठ ओबीसी जागा हो. नव्या क्रांतीचा धागा हो.., अशी घोषणा घेऊन राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने १९ डिसेंबर ते १४ एप्रिलपर्यंत दीक्षाभूमी नागपूर मार्गे कोल्हापूर-पुणे बारामतीपर्यंत अभियान राबविले जात आहे. त्यासाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे बुधवारी अकोल्यात आले होते. पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसींच्या १२ कलमी मागण्यांसाठी हे जनजागृती अभियान राबविले जात आहे. मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह असावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहीर करून, त्यांना नीती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजारे कोटी भांडवल द्यावे, उद्योग व्यवसायासाठी १0 लाखांपर्यंत कर्ज र्मयादा वाढवावी, क्रिमिलेअरची अट रद्द करावी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, मंडल कमिशनची शंभर टक्के अंमलबजावणी करा, शेतकर्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करा, शेतकर्यांच्या तरुण मुलांना उद्योगासाठी शून्य व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून द्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे पण पुढे विधानसभा-लोकसभेत ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशिप ताबडतोब अदा करण्यात यावी, स्पर्धा परीक्षेत महिलांना क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, देशांमध्ये १६00 ओबीसी विद्यार्थी आयएएस झाले, परंतु नॉन क्रिमिलेअरच्या अटीमुळे प्रक्रियेतून बाद ठरविले, त्यांना पुन्हा संधी द्यावी, या मागण्या आहेत. पत्रकार परिषदेला बाळबुधेंसह श्रीकांत पिसे पाटील, महानगराध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, डॉ. आशा मिरगे, अनिल मालगे, दिलीप आगळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक पदाधिकार्यांची गैरहजेरी चर्चेची होती.
मी विदर्भवादी!वेगळय़ा विदर्भासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवारांची भूमिका वेगळी असली, तरी मी व्यक्तीश: वेगळा विदर्भ आणि मराठा आरक्षणाच्या सर्मथनार्थ आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ आमचे नेतेओबीसी नेत्यांना आणि समाजाला संपविण्याचा कट सध्या राज्यात सुरू आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओबीसी नेते आहेत. न्यायपालिकेवर आमचा विश्वास असून, त्यांच्या पाठीशी पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.-