अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, याचा एक भाग म्हणून अकोला शहरात सकाळी मतदार रॅली काढण्यात आली.मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शहरातील शास्त्री स्टेडियम येथून रॅली काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश खवले, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, स्काउट-गाइड, एनसीसी विद्यार्थ्यांसह नागरिक व अपंग संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील विविध रस्त्यांनी मार्गक्रमण करीत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात नवीन मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सहस्त्रकातील मतदार, अपंग-दिव्यांग मतदार, सैनिक मतदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व उत्कृष्ट कार्य करणाºया कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली.