- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लागू असलेल्या ‘लॉकडाउन’ परिस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘अॅप’द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. राज्यातील नवीन वाळू धोरण ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावाचे नियोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खनिकर्म विभागामार्फत करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेणे शक्य नसल्याची बाब काही जिल्ह्यांनी शासनास अवगत केली होती. त्यानुषंगाने शासनामार्फत २७ एप्रिल रोजी पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार वाळू घाटांच्या लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याकरिता जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाउन’ लागू असल्याने ’फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेण्याकरिता ‘अॅप’ किंवा यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून , ई-मेलद्वारे सूचना व हरकती मागवून जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत.त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलावासाठी ‘अॅप’ द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, त्यामध्ये ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाउन’च्या परिस्थितीत वाळू घाटांचा लिलावासाठी ‘अॅप’ द्वारे जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.
वाळू घाटांच्या लिलावासाठी ‘अॅप’द्वारे होणार जनसुनावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:02 AM