अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात शासनाने मंजूर केलेल्या ९६ कोटी ३० लाख रुपये निधीतून ५५७ विकास कामांची निविदा मनपा प्रशासनाने प्रकाशित केली आहे. विकास कामे सोयीस्कर व्हावीत, या उद्देशातून प्रशासनाने विविध कामांच्या आठ निविदा प्रकाशित केल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन प्रभागात विकास कामांचा धडाका सुरू होणार असल्याचे चित्र आहे.मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर नवीन प्रभागातील विकास कामांसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींचा निधी वितरित केला. त्यानुषंगाने मनपाने तयार केलेल्या ५५७ विकास कामांना नगरविकास विभागाने मंजुरी देत मुख्यमंत्र्यांनी ९६ कोटी ३० लाख रुपये अनुदानावर शिक्कामोर्तब केले. संपूर्ण अनुदानाच्या रकमेची एकच निविदा राबविण्याचे शासनाचे निर्देश असल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती. ९६ कोटींच्या विकास कामांसाठी एकच निविदा व्यवहार्यदृष्ट्या शक्य नसल्याचे समोर आल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसोबत चर्चा केली.आठ कामांच्या निविदा जारी९६ कोटींतून प्रत्येक प्रभागात रस्ते, नाल्या, सामाजिक सभागृह, पथदिवे आदी निरनिराळी विकास कामे होतील. कामांचे वर्गीकरण करीत प्रशासनाने जलप्रदाय व विद्युत विभागाची प्रत्येकी एक तसेच बांधकामाच्या सहा अशा एकूण आठ निविदा प्रकाशित केल्या आहेत. निविदा अर्ज स्वीकारण्यासाठी २५ दिवसांचा अवधी निश्चित केला आहे.