लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा वाहन चालकांकडून जादा दर आकारून वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करून दिल्या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी न्यू कोठारी पीयूसी सेंटर वायू प्रदूषण केंद्राचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे.मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार मोटर वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू प्रदूषण तपासणी केंद्रांना देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या रस्ते व सडक परिवहन महामार्ग मंत्रालयाद्वारे निर्गमित अधिसूचनेन्वये अकोला जिल्ह्यातील सर्वच वायू प्रदूषण तपासणी केंद्रांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.वाहनांना आॅनलाइन पद्धतीने वायू प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. असे असतानाही न्यू कोठारी पीयूसी सेंटर येथे वाहन चालकांकडून अधिक दराने पैसे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीनुसार या वायू प्रदूषण तपासणी केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.
वायू प्रदूषण तपासणीचे असे आहेत दरदुचाकी वाहन ३५ रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहने ७० रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारी चारचाकी वाहने ९० रुपये, डीझलवर चालणारी वाहने ११० रुपये असे तपासणीचे दर आहेत.जिल्ह्यातील कोणतेही वायू प्रदूषण तपासणी केंद्र वाहन चालकांकडून अधिक दर आकारत असेल तर वाहन चालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.