आशिष गावंडे / अकोला : कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांच्याकडे मोठय़ा अपेक्षेने अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु किरकोळ कारवाई वगळता मडावी यांनी अद्यापही शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याचे ऐकिवात नाही. अतिक्रमकांचे मनोधैर्य उंचावल्यामुळे की काय, तुकाराम चौकस्थित नित्यानंदनगरमध्ये ४५ हजार चौरस फूट खुल्या जागेवर थेट पक्की घरे उभारण्यात आली. या प्रकरणी महिनाभरापूर्वी तक्रार होऊनही मडावी यांनी कारवाई केली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. माजी महापौर सुमनताई गावंडे तसेच विद्यमान उपमहापौर विनोद मापारी यांच्या प्रभाग क्र.३६ मध्ये तुकाराम चौकनजिकच्या नित्यानंदनगरमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ४५ हजार चौरस फूट खुली जागा आरक्षित आहे. या जागेचा वापर परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी होणे अपेक्षित असताना याठिकाणी अतिक्रमकांनी ठिय्या मांडला आहे. खुल्या जागेवर थेट पक्की घरे उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी नगरसेवकांसह मनपा प्रशासनाकडे तक्रारी करण्याचा प्रयत्न केला असता, अतिक्रमकांकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची दहशत पसरली. ही बाब लक्षात घेता उपमहापौर विनोद मापारी यांनी जून महिन्यात ह्यओपन स्पेसह्णवरील अतिक्रमण हटविण्याचे पत्र मनपा प्रशासनाला दिले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी, साहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे यांनी जागेची पाहणीसुद्धा केली. दीड महिना उलटून गेला तरी अद्यापही मडावी यांनी अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई केली नसल्याचे चित्र आहे. याविषयी माधुरी मडावी यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
‘ओपन स्पेस’वर उभारली पक्की घरे
By admin | Published: July 24, 2015 11:48 PM