अकोला : जम्मू-काश्मीरातीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर मोठा जनक्षोभ उसळला आहे. या घटनेचा अकोल्यात शुक्रवारी राजकीय पक्ष व विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४४ जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध म्हणून अकोला येथे महात्मा गांधी चौकात आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी निदर्शने केली. त्यानंतर हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या चौकात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली.अभाविप ने जाळला पाकचा राष्ट्रध्वजअखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मदनलाल धिंग्रा चौकात एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. सायंकाळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.