- संतोष येलकर
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असले तरी, सोमवार २ ऑगस्ट पर्यंत केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील पीक नुकसानाचे पंचनामे कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाली आणि नदी व नाल्याकाठासह पाटाच्या भागातील शेतजमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन मार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे ; मात्र पूर ओसरल्यानंतर बारा दिवसांचा कालावधी उलटून जात असताना, २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत असून, उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !
तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)
अकोला ६२१० ७४५२
बार्शीटाकळी १२६२५ १६३१५
मूर्तिजापूर ३२४ १६२
अकोट ५६६७ ४५३४
तेल्हारा ४६५२ २८१०
बाळापूर १७८८ १३३६
पातूर ६३३२ ४७५०
जमीन खरडून गेली मोठी ; पंचनामे १००६ हेक्टरवरील !
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात नदी व नाल्याकाठच्या शेतासह पाटाच्या पुरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. परंतु सुरु असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्यात २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात खरडून गेलेल्या जमिनीपैकी केवळ ३ हजार २९८ शेतकऱ्यांच्या १ हजार ६ हेक्टरवरील खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले.
विमा काढलेल्या एक हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे !
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी, आतापर्यंत केवळ १ हजार ३१ शेतकऱ्यांच्या केवळ ५५५ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह संबंधित पथकांमार्फत करण्यात आले.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील शेती व पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सद्यस्थितीत सुरु आहे. आतापर्यंत जिल्हयातील ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
- कांतप्पा खाेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.