अकोला : कोरोना काळात बंद झालेली पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार आहे. मध्य रेल्वेने येत्या १६ डिसेंबरपासून ही द्विसाप्ताहितक विशेष रेल्वे नव्य समय सारणीनुसार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना पुण्यासाठी आणखी एक रेल्वे मिळाली असून, त्याचा फायदा पुणे येथे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना होणार आहे.
मध्य रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस १६ डिसेंबरपासून दर शुक्रवार व रविवारी पुणे येथून रात्री १० वाजून ५० मिनीटांनी रवाना होईल. दौंड, कुर्डवाडी, लातूर, परभणी, हिंगोली या मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी (शनिवार व सोमवार) दुपारी २.५५ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे. ५ मिनिटाच्या थांबानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होणार आहे.
गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्सप्रेस १७ डिसेंबरपासून दर शनिवार व सोमवारी अमरावतीवरुन ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होऊन बडनेरा-मुर्तीजापूर मार्गे त्याच दिवशी रात्री २१.२० अकोला स्थानकावर पोहचणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी (रविवार व मंगळवार)दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहणार आहे.