अकोला, दि. १: बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड खरेदी करणार्या दोन आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी कायम ठेवली आहे. बाळापूर तालुक्यातील कसारखेड येथे गुलाम चिश्ती मशीद ट्रस्टची जमीन आहे. १९६५, ६६ मध्ये पांडुरंग तुकाराम उमाळे ट्रस्टच्या एका इमारतीत भाड्याने राहत होते. ट्रस्टचे तत्कालीन प्रबंधक स्व. सै. महमूद कादरी सै. अहमद कादरी होते. १९८१ मध्ये सै. महमूद कादरी यांनी पांडुरंग उमाळे यांना ट्रस्टची जमीन विकण्याचे निश्चित केले. तशी कागदपत्रेसुद्धा तयार केली; परंतु धर्मायुक्तांच्या मंजुरीनंतर खरेदी होईल, असे ठरले; परंतु १९८३ व ८४ मध्ये त्यांनी तत्कालीन पटवारी बिरबलसिंह दलपतसिंह नरवैय्यासोबत संगनमत करून जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून पांडुरंग उमाळे यांच्याऐवजी त्यांचे भाऊ नामदेव उमाळे यांच्या नावाचा समावेश केला. याबाबत पांडुरंग उमाळे यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. या ठिकाणी दोन्ही गटात तडजोड झाली. त्यात ट्रस्टची जमीन पांडुरंग यांना देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर ट्रस्टच्या प्रबंधकाने पांडुरंग यांना जमिनीचा ताबा दिला नाही. त्यानंतर पांडुरंग उमाळे यांनी पुन्हा तक्रार केली. त्यानुसार तत्कालीन प्रबंधक सै. महमुद कादरी, पटवारी बिरबलसिंह नरवैय्या यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ट्रस्टी सै. महमुद कादरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाळापूर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास आणि ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपींनी या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर प्रथम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही आरोपींना सुनावलेली एक वर्ष सश्रम कारावासाची कायम ठेवली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे, किरण खोत यांनी बाजू मांडली.
भूखंड खरेदीत फसवणूक करणा-या आरोपींची शिक्षा कायम!
By admin | Published: September 02, 2016 1:51 AM